3/30/08

भेट

माझा पत्ता घर तुझ्या प्रेमाचं होतं,
अन् अचानक तू मला बेघर करून गेलीस...
माझी बाग स्वप्नं तुझ्या सहवासाची होती,
अन् तू मला रात्रीची जाग भेट म्हणून दिलीस...

-आस

एखादी कविता

काही जणांची आयुष्यं एखाद्या चांगल्या चारोळीसारखी असतात,
थोडेच काम, पण त्याचे परिणाम खूप असतात...
काहींची आयुष्यं वात्रटिकेसारखी असतात,
नाही रहाणार लक्षात काही वर्षांनी कदाचित,
पण लोकांना जराशी हसवून तर जातात...
खूपच थोडे बाबा आमटे असतात,
महाकाव्य लिहून जाणारे,
आणि -याचश्या जमलेल्या कविताच दिसतात...
काहींच्या कविता फसव्या निघतात,
आशेने जावे शोधायला पण हाती नुसती यमकंच लागतात...
कशीही असो, पण एक तरी बरी कविता लिहावी
थोडा प्रयत्न करून माणसाने,
खर्चावे लागल्यास त्यासाठी मुठभर रुपये आणि पसाभर आणे...
कठीण आहे वागणे, बोलणे आहे सोपे,
मी जाणतो आहे...
एखादी कविता मीही लिहीन म्हणतो आहे...
एखादी बरी कविता मीही लिहीन म्हणतो आहे...
-आस

सुर्योदय

माझ्यासारखी तू पण बसली आहेस का,
उगवत्या सुर्याची वाट बघत?
हो ना?
अगं बघत रहा,
हा आत्ता उगवेल सूर्य,
त्याच्या लाल चुनरीसारख्या किरणांना घेऊन,
ही आत्ता होईल
दररोजच्या धडधडीची इंजिनपहाट,
मग आपलीही धावपळ जीवंत होईल,
उगवत्या सुर्याबरोबर
आपलीही डोकी मावळत जातील कामाच्या डोंगरामागे,
आणि मग संध्याकाळ येईल
आपल्या भेटीची चाहूल देत,
आपण पून्हा एकदा भेटू...
मग तुझे थोडे रुसवे तू वाचशील,
आणि मी माझी थोडी लाडीगोडी लिहून पाहेन,
त्या शीतल सांजेवरती...
एक आणाभाकांची कविता मी सांगेन,
शपथांचे एक गाणे तू गा...
मग, पून्हा ठरवल्याप्रमाणेच,
एकदाही मागे वळून बघता
आपण दोघं थेट आपापल्या घरी येऊ...
आपला थोडा पडीक चेहरा पाहून
घरच्यांना काळजी वाटेल,
पण नेहमीसारखंच त्यांना सांगू,
आपण जाम दमलोय, थोडी विश्रांतीची गरज आहे...
आणि पून्हा मिट्ट अंधार घेऊन
रात्र आपल्या दारात येईल,
पापण्यांमागे लपायला जाईल,
पण त्या उघड्याच राहतील
शेवटी मग ती चिडून खोलीभर पसरेल...
आताशा कधीकधी मला वाटू लागलंय की,
मी उगवत्या सुर्याचीच वाट जास्त बघतो,
आणि तुझी वाट बघायला वेळच मिळत नाही,
उसाशांनाही माझ्या सहवासाचा छंद जडलाय हल्ली,
आणि मला सुर्योदयाची वाट बघत बसायचा...
पण नकोच...
तू नकोच जागूस आत्ताही...
जमलं तर झोप जाऊन शांतपणे,
कारण मी म्हणतोय खरा,
आत्ता होईल, आत्ता होईल म्हणून,
पण बहुतेक हे माझंच सांत्वन करतोय मी,
आणि तुला आधार कसला देणार
या शब्दांच्या कुबड्यांनी,
कारण मला पक्कं ठाऊक आहे की
अजून सुर्योदय व्हायला अख्ख्या शतकाएवढी
रात्र मांडून ठेवली आहे पुढ्यात...
म्हणून तू झोपच जाऊन शांतपणे,
आणि मला बसू दे इथे तुझ्या आठवणींमध्ये गुरफटून,
या काळवंडलेल्या मध्यरात्री...
होय, हा आत्ता उगवेल सूर्य,
ही आत्ता होईल पहाट...
होय, हा आत्ता उगवेल सूर्य,
ही आत्ता होईल पहाट...

-आस

ध्यानस्थ दिवा

दिव्याखाली...
कधी विश्वाच्या आदिची, तर कधी अंताची आस बनून,
भटकत राहिलो,
एक दिवस चोरून काळाच्या तिजोरीतला,
आणि सोडवत बसलो,
केसात गुंतलेल्या कंगव्यासारखे अडकलेले
हे सवाल...
का आहे, कोण आहे आणि कशासाठी आहे मी इथे, दुनियेमध्ये...
या अथांग विश्वसागरामध्ये फिरता-फिरता,
अचानक सुचलं काहीतरी,
आणि जाऊन ठाकलो, बुद्धाच्या पुढ्यात...
ज्याने रोजच्या रोज मरणा-या
या तमाम दुनियेला,
जगायला शिकवायचा ध्यास,
घेतला होता आपल्या खांद्यावर ओढून...
टक लावून पाहात राह्यलो,
त्याचे ते ध्यानामध्ये,
सदा डुंबत राहणारे डोळे...
जणू काही, या मुद्रेला आणि डोळ्यांना विलग करणं,
अशक्य आहे,
असंच वाटत होतं सारखंसारखं...
आता मीच ध्यानात शिरेन की काय,
अशी भीती वाटून मी दचकून भानावर आलो...
आणि त्याच्यासमोर ठेवल्या या सा प्रश्नचिन्हांच्या गुंफा,
ज्या मला त्याच्या डोळ्याएवढ्याच खोल वाटत होत्या,
आणि म्हटलं, "दादा, बघ ना, कधीपासून मानगुटीवर बसलंय हे सारं"
त्या गुढ डोळ्यांवरच्या पापण्या जराशा उंचावल्या...
आणि, शतकानुशतकं बंदच होते,
असं वाटणारे ते ओठ...
मंद स्मित चमकू लागलं त्यावर...
त्या स्मिताने केलं माझ्या अर्धशुद्धी मनाशी हितगुज,
"या गुंफा तर त्याने लहानपणीच पार करून ठेवल्यात"...
आणि मी खजील झालो...
ते स्मित त्याच्या डोळ्यांत उतरलं...
म्हणालं, "चला, तू पहिल्या पायरीवर तर पोचलास,
लोक इथे यायला पण घाबरतात,
पहिली पायरी म्हणजे प्रश्न,
दुसरी पायरी म्हणजे चिंता,
तिसरी म्हणजे राग,
आणि चौथी म्हणजे उत्तर..."
मला वाटलं, "उत्तर म्हणजे तेच जे,
हा वर्षानुवर्षं लोकांना सांगत राहिला,
त्याच्या संदेशातून...
अहिंसा... अहिंसा... अहिंसा...
आणि आता तर हा ध्यानाच्या पाचव्या पायरीवर पोचलाय"...
आता जरासं हसुच आलं त्याच्या चेह-यावर...
हसु म्हणालं, "बेटा, पाय-या संपल्या आता,
हे ध्यान म्हणजे पायरी नव्हे,
हे ध्यान म्हणजे ध्येय आहे,
ही तर चिरंतन मुद्रा आहे...
कारण ही उत्तरं मिळाल्यावर मन शांत होतं,
आणि शरीर फिरू लागतं, हा प्रकाश पसरवायला...
तू, तू उरत नाहीस मग"...
तेव्हा मला कळलं,
"याच्या क्षितीजं कवेत घेऊ पाहणा-या विचारांचं
मंदीर मनात बांधता,
याच्या प्रतिमांची मंदिरं बांधली,
याला नमस्कारात-चमत्कारात,
आकारात-अवतारात बंदिस्त केला,
याचे अनुयायी म्हणवणा-यांनीच,
तरीपण हा ध्यानस्तब्ध का ते...
चिंता, राग वगैरे नामशेष झालेले कधीच,
आता हा ध्यानस्थ दिवा होऊन बसलाय प्रत्येकासाठी,
तथाकथित अनुयायी
कितीही काजळी लावोत आपापल्या दिव्यावर,
पण हा प्रकाशच देतो...
हा प्रकाशच देणार...
हा प्रकाशच देत राहणार...
-आस

2/6/08

पाउस

पावसाळ्यात...
काहीतरी गरमागरम चमचमीत खायला करावं,
आणि पावसाने नेमकी दडी मारून,
आभाळात सुर्याने उडी मारावी,
असं हल्ली फार घडतं,
म्हणून मी एक दिवस पावसालाच
घरी जेवायला बोलावलं,
पाउस भट असावा- लगेच हो म्हणाला!
पाउस असताना जेवण म्हणून त्यादिवशी
झक्कास खिचडी-सार-आणि साजुक तुप
असा बेत बनवला...

पाउस म्हणाला, 'सार जरा पांचट झालं होतं'!
एक गडगडणारी ढेकर देऊन म्हणाला, 'मी जरा पडतो',
'मी' ताबडतोब फोन करून 'ती'ला बोलावून घेतलं,
आणि आम्ही मनसोक्त भिजलो,
'ती'ही त्याला जेवायचं निमंत्रण देणार होती,
पण तोपर्यंत तो पडून रिता झाला होता...

-आस

1/27/08

चारोळ्या

'यायला उशीर होईल' म्हणुन घरी फोन करण्यासाठी
'ती'ने रुपयाचं कॉईन मागितलं,
माझायाकडे सुट्टे आठाणेच होते...
'ती'च्या मुडच्या श्रीखंडावर पेरायला
'ती'ने चारोळ्या मागितल्या,
माझ्याकडे फक्त फुटाणेच होते...
-आस

1/14/08

नेहमी नेहमी

नेहमी नेहमी हे सालं अस्संच का होतं,
फुल फुलायला काही दिवस लागतात,
पण ते पडायला काही क्षणच घेतं...
आजपण हे सालं अस्संच झालं,
'ती'ने थांबावं, म्हणुन 'मी' तीन तीन (=सहा!) कप coffee मागवली,
'ती'ने बोलावं, म्हणुन 'मी' तीन तीन लेक्चर्स बुडवली...
(तीही आवडत्या मिसची!)
आणि 'ती'ने मात्र निघून जायला,
'बा य' ही दोनच अक्षरं घेतली...

-आस

सरकारी कर्मचारी

सरकारी खात्यात खा खा करून
मन माझं खात राहतं,
तरीही मी खाणं सोडत नाही...
कारण माझ्या मुल्यांपेक्षा
माझ्या मुलांशी माझं जवळचं आहे नातं!
-आस