पावसाळ्यात... काहीतरी गरमागरम चमचमीत खायला करावं, आणि पावसाने नेमकी दडी मारून, आभाळात सुर्याने उडी मारावी, असं हल्ली फार घडतं, म्हणून मी एक दिवस पावसालाच घरी जेवायला बोलावलं, पाउस भट असावा- लगेच हो म्हणाला! पाउस असताना जेवण म्हणून त्यादिवशी झक्कास खिचडी-सार-आणि साजुक तुप असा बेत बनवला... पाउस म्हणाला, 'सार जरा पांचट झालं होतं'! एक गडगडणारी ढेकर देऊन म्हणाला, 'मी जरा पडतो', 'मी' ताबडतोब फोन करून 'ती'ला बोलावून घेतलं, आणि आम्ही मनसोक्त भिजलो, 'ती'ही त्याला जेवायचं निमंत्रण देणार होती, पण तोपर्यंत तो पडून रिता झाला होता...
नेहमी नेहमी हे सालं अस्संच का होतं, फुल फुलायला काही दिवस लागतात, पण ते पडायला काही क्षणच घेतं... आजपण हे सालं अस्संच झालं, 'ती'ने थांबावं, म्हणुन 'मी' तीन तीन (=सहा!) कप coffee मागवली, 'ती'ने बोलावं, म्हणुन 'मी' तीन तीन लेक्चर्स बुडवली... (तीही आवडत्या मिसची!) आणि 'ती'ने मात्र निघून जायला, 'बा य' ही दोनच अक्षरं घेतली...