3/30/08

सुर्योदय

माझ्यासारखी तू पण बसली आहेस का,
उगवत्या सुर्याची वाट बघत?
हो ना?
अगं बघत रहा,
हा आत्ता उगवेल सूर्य,
त्याच्या लाल चुनरीसारख्या किरणांना घेऊन,
ही आत्ता होईल
दररोजच्या धडधडीची इंजिनपहाट,
मग आपलीही धावपळ जीवंत होईल,
उगवत्या सुर्याबरोबर
आपलीही डोकी मावळत जातील कामाच्या डोंगरामागे,
आणि मग संध्याकाळ येईल
आपल्या भेटीची चाहूल देत,
आपण पून्हा एकदा भेटू...
मग तुझे थोडे रुसवे तू वाचशील,
आणि मी माझी थोडी लाडीगोडी लिहून पाहेन,
त्या शीतल सांजेवरती...
एक आणाभाकांची कविता मी सांगेन,
शपथांचे एक गाणे तू गा...
मग, पून्हा ठरवल्याप्रमाणेच,
एकदाही मागे वळून बघता
आपण दोघं थेट आपापल्या घरी येऊ...
आपला थोडा पडीक चेहरा पाहून
घरच्यांना काळजी वाटेल,
पण नेहमीसारखंच त्यांना सांगू,
आपण जाम दमलोय, थोडी विश्रांतीची गरज आहे...
आणि पून्हा मिट्ट अंधार घेऊन
रात्र आपल्या दारात येईल,
पापण्यांमागे लपायला जाईल,
पण त्या उघड्याच राहतील
शेवटी मग ती चिडून खोलीभर पसरेल...
आताशा कधीकधी मला वाटू लागलंय की,
मी उगवत्या सुर्याचीच वाट जास्त बघतो,
आणि तुझी वाट बघायला वेळच मिळत नाही,
उसाशांनाही माझ्या सहवासाचा छंद जडलाय हल्ली,
आणि मला सुर्योदयाची वाट बघत बसायचा...
पण नकोच...
तू नकोच जागूस आत्ताही...
जमलं तर झोप जाऊन शांतपणे,
कारण मी म्हणतोय खरा,
आत्ता होईल, आत्ता होईल म्हणून,
पण बहुतेक हे माझंच सांत्वन करतोय मी,
आणि तुला आधार कसला देणार
या शब्दांच्या कुबड्यांनी,
कारण मला पक्कं ठाऊक आहे की
अजून सुर्योदय व्हायला अख्ख्या शतकाएवढी
रात्र मांडून ठेवली आहे पुढ्यात...
म्हणून तू झोपच जाऊन शांतपणे,
आणि मला बसू दे इथे तुझ्या आठवणींमध्ये गुरफटून,
या काळवंडलेल्या मध्यरात्री...
होय, हा आत्ता उगवेल सूर्य,
ही आत्ता होईल पहाट...
होय, हा आत्ता उगवेल सूर्य,
ही आत्ता होईल पहाट...

-आस

No comments: