3/30/08

ध्यानस्थ दिवा

दिव्याखाली...
कधी विश्वाच्या आदिची, तर कधी अंताची आस बनून,
भटकत राहिलो,
एक दिवस चोरून काळाच्या तिजोरीतला,
आणि सोडवत बसलो,
केसात गुंतलेल्या कंगव्यासारखे अडकलेले
हे सवाल...
का आहे, कोण आहे आणि कशासाठी आहे मी इथे, दुनियेमध्ये...
या अथांग विश्वसागरामध्ये फिरता-फिरता,
अचानक सुचलं काहीतरी,
आणि जाऊन ठाकलो, बुद्धाच्या पुढ्यात...
ज्याने रोजच्या रोज मरणा-या
या तमाम दुनियेला,
जगायला शिकवायचा ध्यास,
घेतला होता आपल्या खांद्यावर ओढून...
टक लावून पाहात राह्यलो,
त्याचे ते ध्यानामध्ये,
सदा डुंबत राहणारे डोळे...
जणू काही, या मुद्रेला आणि डोळ्यांना विलग करणं,
अशक्य आहे,
असंच वाटत होतं सारखंसारखं...
आता मीच ध्यानात शिरेन की काय,
अशी भीती वाटून मी दचकून भानावर आलो...
आणि त्याच्यासमोर ठेवल्या या सा प्रश्नचिन्हांच्या गुंफा,
ज्या मला त्याच्या डोळ्याएवढ्याच खोल वाटत होत्या,
आणि म्हटलं, "दादा, बघ ना, कधीपासून मानगुटीवर बसलंय हे सारं"
त्या गुढ डोळ्यांवरच्या पापण्या जराशा उंचावल्या...
आणि, शतकानुशतकं बंदच होते,
असं वाटणारे ते ओठ...
मंद स्मित चमकू लागलं त्यावर...
त्या स्मिताने केलं माझ्या अर्धशुद्धी मनाशी हितगुज,
"या गुंफा तर त्याने लहानपणीच पार करून ठेवल्यात"...
आणि मी खजील झालो...
ते स्मित त्याच्या डोळ्यांत उतरलं...
म्हणालं, "चला, तू पहिल्या पायरीवर तर पोचलास,
लोक इथे यायला पण घाबरतात,
पहिली पायरी म्हणजे प्रश्न,
दुसरी पायरी म्हणजे चिंता,
तिसरी म्हणजे राग,
आणि चौथी म्हणजे उत्तर..."
मला वाटलं, "उत्तर म्हणजे तेच जे,
हा वर्षानुवर्षं लोकांना सांगत राहिला,
त्याच्या संदेशातून...
अहिंसा... अहिंसा... अहिंसा...
आणि आता तर हा ध्यानाच्या पाचव्या पायरीवर पोचलाय"...
आता जरासं हसुच आलं त्याच्या चेह-यावर...
हसु म्हणालं, "बेटा, पाय-या संपल्या आता,
हे ध्यान म्हणजे पायरी नव्हे,
हे ध्यान म्हणजे ध्येय आहे,
ही तर चिरंतन मुद्रा आहे...
कारण ही उत्तरं मिळाल्यावर मन शांत होतं,
आणि शरीर फिरू लागतं, हा प्रकाश पसरवायला...
तू, तू उरत नाहीस मग"...
तेव्हा मला कळलं,
"याच्या क्षितीजं कवेत घेऊ पाहणा-या विचारांचं
मंदीर मनात बांधता,
याच्या प्रतिमांची मंदिरं बांधली,
याला नमस्कारात-चमत्कारात,
आकारात-अवतारात बंदिस्त केला,
याचे अनुयायी म्हणवणा-यांनीच,
तरीपण हा ध्यानस्तब्ध का ते...
चिंता, राग वगैरे नामशेष झालेले कधीच,
आता हा ध्यानस्थ दिवा होऊन बसलाय प्रत्येकासाठी,
तथाकथित अनुयायी
कितीही काजळी लावोत आपापल्या दिव्यावर,
पण हा प्रकाशच देतो...
हा प्रकाशच देणार...
हा प्रकाशच देत राहणार...
-आस

No comments: